भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी
महर्षी कर्वे – ज्यांना प्रेमाने ‘अण्णा’ असे संबोधले जाते – यांचा जन्म महाराष्ट्रातील कोकण भागात दि. १८ एप्रिल १८५८ या दिवशी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावी त्यांचे बालपण मोठ्या कष्टात आणि गरिबीत व्यतीत झाले. बालविवाहासारख्या क्रूर प्रथेचे दुष्परिणाम त्यांनी स्वत: पाहिले होते. स्वत:च्या प्रथम पत्नीचे अकाली देहावसान झाल्यानंतर त्यांनी विचारपूर्वक विधवा मुलीशी पुनर्विवाह केला आणि याद्वारे समाजसुधारणेचे एक उदाहरण समाजासमोर ठेवले. अर्थात यामुळे तत्कालीन समाजाचा फार मोठा रोष त्यांनी ओढवून घेतला पण तरीही ते आपल्या निश्चयावर ठामच राहिले.
महर्षी कर्व्यांनी स्त्री-शिक्षणाचे महत्व ओळखले व तेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून त्याकरिता स्वत:स समर्पित केले. तत्कालीन सामाजिक दृष्टिकोन आणि जुन्या रूढींच्या विरोधात उभे राहणे अत्यंत आव्हानात्मक होते. प्रदीर्घ कालावधीनंतर हळूहळू स्त्री-शिक्षणाबाबत अपेक्षित जागृती होऊ लागली. आज सर्वांगांनी विकसित झालेली ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ हे त्यांच्याच कठोर परिश्रमांचे व दूरदृष्टीचे फळ आहे.